
मुंबई JPN NEWS - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांतील लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्यासह रेल्वेवरील मेगाब्लॉक टाळण्याचे निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत. गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मेट्रो आणि रेल्वे प्रशासनाने विशेष नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवात गणेश मंडळांना भेट देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मेट्रो आणि लोकलचा वापर करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या दोन फेऱ्यांमधील अंतर कमी करून अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात याव्यात. तसेच रात्री उशिरापर्यंत, आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर गणेशोत्सवाच्या कालावधीत नियमित मेगा ब्लॉक तसेच रात्रकालीन ब्लॉक घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गणेश दर्शनावरून रात्री परतणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त विशेष लोकल फेऱ्या सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
प्रमुख रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त आरपीएफ आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात करून गर्दी नियंत्रण आणि प्रवाशांच्या सुरक्षेची व्यवस्था मजबूत करण्यास सांगण्यात आले आहे.
मेट्रो स्थानकांवर सुविधा २४ तास उपलब्ध ठेवण्याच्या सूचना -
गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो स्थानकांवरील तिकीट काऊंटर, एटीव्हीएम, डिजिटल आणि क्यूआर तिकीट सुविधा मेट्रोची शेवटची फेरी होईपर्यंत कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. तसेच लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्राथमिक उपचार केंद्रेही सेवा सुरू असेपर्यंत उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गर्दीच्या मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा रक्षक आणि क्राऊड मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, मेट्रोच्या वेळापत्रकातील बदलांची माहिती डिस्प्ले बोर्ड, उद्घोषणा आणि अधिकृत समाजमाध्यमांद्वारे प्रवाशांना देण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
“गणेशोत्सवात लाखो भाविक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. त्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि वेळेत व्हावा, यासाठी मेट्रो आणि रेल्वे प्रशासनाने समन्वयाने अतिरिक्त सेवा, सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करावी,” असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment