
मुंबई JPN NEWS - गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी परिसरातील गौतम नगर, मॉडर्न बेकरी जंक्शनजवळील गोठ्यातील पाण्याच्या टाकीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२१ ऑगस्ट) दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुले पाण्याच्या टाकीत बुडाल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही बाहेर काढले. त्यानंतर त्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले. मृतांमध्ये झैब पटेल (१५) आणि नखीब खान (१३) यांचा समावेश आहे.
झैब हा इयत्ता दहावीचा, तर नखीब हा इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. दोघेही जोगेश्वरी गुंफा इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. घटनेच्या दिवशी दोन्ही विद्यार्थी शाळेत अनुपस्थित होते.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


No comments:
Post a Comment