मुंबईत ६१ लाखांचे कोकेन जप्त; नायजेरियन नागरिकाला अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 September 2026

मुंबईत ६१ लाखांचे कोकेन जप्त; नायजेरियन नागरिकाला अटक


मुंबई JPN NEWS - मुंबईत अंमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि पुरवठा करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असताना अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने १२२ ग्रॅम कोकेन जप्त केले. या कोकेनची अंदाजे किंमत ६१ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून सुरू आहे.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पथक मुंबई शहरात अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि साठा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत होते. त्यावेळी ना. म. जोशी मार्ग परिसरात एका नायजेरियन नागरिकाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे १२२ ग्रॅम वजनाचे कोकेन आढळून आले.

पोलिसांनी हे अंमली पदार्थ जप्त करून संबंधित व्यक्तीविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) सह २१(क) तसेच इमिग्रेशन आणि परदेशी कायदा २०२५ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ११ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३.४५ ते सकाळी ६.२० वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.

पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली. पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित साळी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS