
मुंबई JPN NEWS - गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या वाढीव प्रवासी गर्दीचा विचार करून कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी व्यापक तयारी केली आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालविण्यात येणार असून, वैद्यकीय सेवा, प्रवासी मदत केंद्रे, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थाही बळकट करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात उधना जंक्शन, विश्वामित्री, वलसाड, वडोदरा, नागपूर, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, दिवा आणि पनवेल येथून चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव आणि ठोकूरपर्यंत विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रमुख स्थानकांवर वैद्यकीय सुविधा -
१२ सप्टेंबरपासून माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर प्राथमिक उपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या समन्वयाने ही केंद्रे पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांमार्फत चालविली जातील.
चिपळूण आणि रत्नागिरी येथील आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतील. प्रमुख स्थानकांवर आरोग्य तपासणी, रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी, आरोग्य जनजागृती तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत शासकीय व संलग्न रुग्णालयांच्या रुग्णवाहिका उपलब्ध असतील.
प्रवाशांसाठी विशेष सुविधा -
गर्दीच्या काळात तिकीट खिडक्यांवर विशेष रांगा करण्यात येणार असून माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड आणि सावंतवाडी रोड येथे प्री-प्रिंटेड UTS तिकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ येथे ‘एम-UTS सहाय्यक’ सुविधा उपलब्ध असेल.
माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी येथे २४ तास ‘रेल यात्री सहायता केंद्र’ सुरू राहणार आहेत. गर्दी वाढल्यास माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे प्रवाशांसाठी होल्डिंग एरिया तयार करण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी कोकण रेल्वे आणि एसटी महामंडळ समन्वयाने बससेवा उपलब्ध करून देणार आहेत. स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीमही राबविण्यात येणार आहे.
सुरक्षा आणि स्वच्छतेवर भर -
गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे २४ तास देखरेख ठेवण्यात येणार असून, रेल्वे सुरक्षा दल स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणार आहे.
स्थानकांवरील स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. प्रवाशांना जेवण व अल्पोपहार सहज उपलब्ध व्हावा यासाठी सर्व खाद्यपदार्थांचे स्टॉल गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्थानकांवर गणेशोत्सवाचा उत्साह -
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानकांवर पूजा साहित्य, सजावटीच्या वस्तू, फळे, फुले आणि काजू मोदकांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे स्थानिक कलाकारांसाठी विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या व्यासपीठावर कला-सादरीकरण, संगीत कार्यक्रम, भजने, जाखडी, कळसूत्री बाहुल्यांचे प्रयोग, कराओके आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करता येणार आहेत. इच्छुक कलाकारांनी संबंधित स्थानक प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांसाठी विशेष सेल्फी पॉइंट, रंगीत रांगोळी आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी, ट्रम्पेट वादन तसेच लहान मुलांचे फुगे व क्रेयॉन्स देऊन स्वागत करण्याचे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. स्वयंसेवी संस्था आणि खासगी संस्थांच्या सहकार्याने वैद्यकीय शिबिरे व मोफत पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केली जाणार आहे.
गणेशोत्सवातील प्रवास सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुखकर होण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे तसेच स्थानकांवर स्वच्छता व शिस्त राखावी, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.


No comments:
Post a Comment