पालिका अभियंत्यांच्या बदल्या आता ऑनलाइन; ५ ते २० सप्टेंबर अर्जाची मुदत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2026

पालिका अभियंत्यांच्या बदल्या आता ऑनलाइन; ५ ते २० सप्टेंबर अर्जाची मुदत


मुंबई JPN NEWS - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता संवर्गातील बदल्या आता ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत. अभियंत्यांना विविध विभागांमध्ये कामाचा अनुभव मिळावा आणि सर्वांना समान संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. बदलीस पात्र अभियंत्यांना ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून पसंतीचे प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहेत.

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मान्यतेनुसार २ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या २७ जानेवारी २०२१ रोजीच्या धोरणानुसार अभियंता संवर्गातील नियमित बदल्या दरवर्षी १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. संबंधित खात्यात किंवा विभागात तीन वर्षे अथवा त्याहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी करण्यात येणार आहेत.

२०२५ मधील बदल्यांना स्थगिती, नंतर रद्द -
ऑक्टोबर २०२५ मध्ये १२२ दुय्यम अभियंता (स्थापत्य), ३४ सहाय्यक अभियंता (स्थापत्य) आणि सात सहाय्यक अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी तत्कालीन आदेशानुसार या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. त्यानंतर महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीने हे बदली आदेश रद्द करण्यात आले.

यानंतर प्रशासकीय गरज तसेच अत्यावश्यक विनंतीच्या आधारे अभियंता संवर्गातील बदल्यांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून १४२ दुय्यम अभियंता (स्थापत्य) आणि २७ सहाय्यक अभियंता (स्थापत्य) यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये अभियंत्यांचे विनंती अर्ज, विभागांकडून आलेल्या विनंत्या, रिक्त पदांची उपलब्धता तसेच प्राप्त शिफारशींचा विचार करण्यात आला.

४४० हून अधिक पदे पदोन्नतीने भरली -
ऑक्टोबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत अभियंता संवर्गातील ४४० हून अधिक रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात आली. यामध्ये उपप्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता तसेच वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञांच्या पदांचा समावेश आहे. पदोन्नतीनंतर पदस्थापना देताना रिक्त पदे, विनंती अर्ज, संबंधित अभियंत्यांचा अनुभव आणि प्राप्त शिफारशींचा विचार करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गुणवत्ता यादी आणि सोडतीने विभागांचे वाटप - 
'अ' गटातील उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव), प्रमुख अभियंता (दक्षता) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या विभागांसाठी दुय्यम व सहाय्यक अभियंता (स्थापत्य) संवर्गाची परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार करून गुणवत्ता क्रमांकानुसार पारदर्शक सोडत पद्धतीने विभागांचे वाटप केले जाते.

ऑनलाइन बदली प्रक्रियेमुळे अभियंत्यांना आपल्या पसंतीचे विभाग प्राधान्यक्रमाने निवडण्याची संधी मिळणार असून, बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निःपक्षपातीपणा येण्याची अपेक्षा महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS