
मुंबई JPN NEWS - ब्रिटनमधील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यासाठी रवाना झालेल्या शिष्टमंडळाला बसला. शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरवण्याऐवजी स्वित्झर्लंडमधील झ्युरिक विमानतळाकडे वळवण्यात आले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे विमान नियोजित वेळापत्रकानुसार लंडनमध्ये पोहोचले असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी (OSD), अधिकृत छायाचित्रकारांसह एकूण सहा जण संबंधित विमानातून प्रवास करत होते. मात्र, हिथ्रो विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील तांत्रिक अडचणीमुळे विमानाचे लँडिंग लंडनऐवजी झ्युरिक येथे करण्यात आले.
हिथ्रोवरील हवाई वाहतूक विस्कळीत -
ब्रिटनच्या National Air Traffic Services (NATS) च्या फ्लाइट-प्रोसेसिंग प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने ८ सप्टेंबर रोजी ब्रिटनमधील अनेक विमानतळांवरील हवाई वाहतूक विस्कळीत झाली. हिथ्रोसह प्रमुख विमानतळांवर उड्डाणांना विलंब झाला, तर मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द करण्यात आली. हिथ्रोनेही सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ आगमन सेवा स्थगित केली होती.
या बिघाडाचा परिणाम केवळ ब्रिटनपुरता मर्यादित राहिला नाही. लंडनकडे जाणाऱ्या काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले. मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI 131 हे विमानही हिथ्रोवरील परिस्थितीमुळे झ्युरिकला उतरल्याचे वृत्त आहे.
शिष्टमंडळाला पर्यायी व्यवस्था -
झ्युरिकमध्ये विमान उतरवल्यानंतर शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना लंडनला पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. विमान वाहतूक पूर्ववत होत असली तरी तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेला बॅकलॉग आणि विस्कळीत वेळापत्रक यामुळे प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.
दोन दिवसांचा लंडन दौरा -
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसांचा लंडन दौरा नियोजित आहे. ब्रिटिश संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या दौऱ्यादरम्यान शिंदे यांचा ब्रिटनमधील विविध प्रतिनिधी आणि संस्थांशी संवाद होणार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि शिष्टमंडळातील सदस्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, हिथ्रो विमानतळावरील तांत्रिक बिघाडामुळे शिंदे यांच्या शिष्टमंडळाचे विमान झ्युरिकला वळवावे लागल्याने या दौऱ्यात अनपेक्षित अडथळा निर्माण झाला आहे.


No comments:
Post a Comment