
मुंबई JPN NEWS - मुंबई महापालिकेतील ‘समाज विकास अधिकारी’ संवर्गातील पदे भरण्याच्या सध्याच्या धोरणात बदल करून ५० टक्के पदे पालिका कर्मचाऱ्यांमधून अंतर्गत निवडीने भरण्यात यावीत, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे.
सध्या समाज विकास अधिकारी संवर्गातील ८० टक्के पदे सरळसेवेने, तर २० टक्के पदे अंतर्गत निवडीच्या माध्यमातून भरली जातात. मात्र, पालिकेच्या विविध खात्यांमध्ये समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी अर्थात Master in Social Work (MSW) प्राप्त केलेले अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नतीची संधी मिळावी, यासाठी विद्यमान धोरणात बदल करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
यासंदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांना पत्र दिले आहे. समाज विकास अधिकारी संवर्गातील पदांसाठी ५० टक्के अंतर्गत निवड आणि ५० टक्के सरळसेवा अशी सुधारित पदभरती पद्धत लागू करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
या विषयावर प्रशासन आणि संघटनेची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, अशीही विनंती करण्यात आली आहे. तसेच बैठकीस नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांना उपस्थित राहण्यासाठी पाचारण करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
पालिकेतील पात्र कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा उपयोग समाज विकासाच्या कामांसाठी करून त्यांना योग्य संधी देण्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.


No comments:
Post a Comment