
मुंबई JPN NEWS - महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह परराज्यांतून चोरी केलेले आयफोन खरेदी करून त्यांचे Apple ID काढून ते परराज्य तसेच परदेशात विक्री करणाऱ्या टोळीचा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ६४ चोरीचे आयफोन आणि मोबाईलचे वेगवेगळे केलेले पार्ट्स असा एकूण ४४ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात मे २०२६ मध्ये आयफोन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना चोरीच्या मोबाईलमध्ये एका सिमकार्डचा वापर झाल्याचे आढळले. त्यानुसार तांत्रिक तपास करत पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला. त्याच्याकडून २१ चोरीचे आयफोन आणि १२ सिमकार्ड जप्त करण्यात आले.
त्यानंतर केलेल्या पुढील तपासात चोरीचे मोबाईल खरेदी करणाऱ्या टोळीचा पोलिसांना माग लागला. ही टोळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांतून चोरी केलेले आयफोन खरेदी करत होती. त्यानंतर मोबाईलमधील Apple ID काढून ते परराज्यात आणि परदेशात विकले जात असल्याचे तपासात समोर आले.
काही मोबाईलमधून Apple ID काढता येत नसल्यास त्यांचे मिडल बॉडी, डिस्प्ले, बॅटरी, मदरबोर्ड, लॉजिक बोर्ड यांसारखे भाग वेगळे केले जात होते. हे पार्ट्स बाजारात कमी किमतीत विकले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ६४ आयफोन तसेच चोरीच्या मोबाईलचे २० वेगवेगळे केलेले पार्ट्स जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तेलंगणा येथील ११, दिल्लीतील ३, महाराष्ट्र/मुंबईतील १९, कर्नाटकातील २, राजस्थान, तमिळनाडू आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी एका गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मुळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) फरिद खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.


No comments:
Post a Comment