
मुंबई JPN NEWS - युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून, उद्योग व आस्थापनांसह समाजातील प्रत्येक घटकाचे सामाजिक उत्तरदायित्व आहे. महाराष्ट्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असून, युवकांनी कौशल्याधारित क्षेत्रातील संधींचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास विभाग आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ‘एम्प्लॉयर राऊंड टेबल’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोढा बोलत होते.
लोढा म्हणाले की, अनेक युवकांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता असूनही मुलाखतीच्या वेळी आवश्यक कौशल्ये किंवा आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. त्यामुळे त्यांना अपेक्षित रोजगार मिळण्यात अडचणी येतात. उद्योगांनी आपल्या गरजेनुसार कौशल्ये असलेल्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.
कौशल्याधारित रोजगाराच्या संधींकडे युवकांनी पाहावे -
परदेशात कौशल्याधारित क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांना चांगले वेतन आणि रोजगाराच्या संधी मिळतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील युवकांना कौशल्याधारित तसेच चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ३२ नामांकित उद्योग व आस्थापनांच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. रोजगार महाकुंभाबाबत उद्योग व आस्थापनांच्या सूचना, हरकती किंवा अडचणी असल्यास त्या कौशल्य विकास विभागाला कळवाव्यात, असे सांगण्यात आले.
उद्योग व आस्थापनांसाठी कौशल्य विकास विभागाच्या वतीने ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित कंपन्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन लोढा यांनी केले. ऑनलाइन नोंदणी करताना तांत्रिक अडचण आल्यास कौशल्य विकास विभाग किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.
रिक्त पदांची माहिती देण्याचे कंपन्यांना आवाहन -
कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या रिक्त जागांची माहिती विभागाला द्यावी. त्या पदांसाठी आवश्यक कौशल्ये असलेले योग्य युवक-युवती उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभाग प्रयत्न करेल, असे लोढा यांनी सांगितले.
राज्याच्या विकासासाठी उद्योगांनीही आपली भूमिका बजावली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट देशासमोर ठेवले असून, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योग, सरकार आणि युवकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी कौशल्य विकास विभागाचे आयुक्त अमित सैनी यांनी सादरीकरणाद्वारे उद्योग व आस्थापनांच्या प्रतिनिधींना रोजगार महाकुंभाची माहिती दिली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment