मालमत्ता खात्यातील सफाई कामगारांनाही कालबद्ध पदोन्नतीचा लाभ द्या, कामगार सेनेची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 September 2026

मालमत्ता खात्यातील सफाई कामगारांनाही कालबद्ध पदोन्नतीचा लाभ द्या, कामगार सेनेची मागणी


मुंबई JPN NEWS - मुंबई महापालिकेच्या मालमत्ता खात्यात कार्यरत सफाई कामगारांनाही घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांप्रमाणे दुसरी आणि तिसरी कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’चे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केली आहे. ज्या तारखेपासून पदोन्नती अनुज्ञेय ठरेल, त्या तारखेपासून कर्मचाऱ्यांना थकबाकीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत सफाई कामगारांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देताना विहित शैक्षणिक अर्हता, म्हणजे सातवी उत्तीर्णची अट शिथिल करण्याचे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, या धोरणात पहिली, दुसरी आणि तिसरी पदोन्नती याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने अनेक सफाई कामगारांना दुसरी कालबद्ध पदोन्नती नाकारण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे.

या प्रश्नावर ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’ने महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. बैठकीतील चर्चेनंतर पहिली, दुसरी आणि तिसरी कालबद्ध पदोन्नती देताना एकसूत्रता आणण्यासाठी परिपत्रक काढण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

मालमत्ता खात्यातील कर्मचाऱ्यांनाही लाभ द्या - 
घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगार आणि मालमत्ता खात्यातील सफाई कामगार यांच्या कामाचे स्वरूप तसेच सेवाशर्ती एकसमान असल्याचा दावा संघटनेने केला आहे. दोन्ही विभागांतील सफाई कामगार लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार लाभार्थी असल्याने घनकचरा व्यवस्थापन खात्यासाठी काढण्यात आलेले संबंधित परिपत्रक मालमत्ता खात्यातील सफाई कामगारांनाही लागू करावे, अशी मागणी डॉ. कांबळे-बापेरकर यांनी सहआयुक्त संजोग कबरे यांच्याकडे केली आहे.

मालमत्ता खात्यातील सफाई कामगारांना दुसरी आणि तिसरी कालबद्ध पदोन्नती मंजूर करून त्याचा आर्थिक लाभ संबंधित पात्रता दिनांकापासून देण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS