गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज; महापौर रितू तावडेंकडून विसर्जनस्थळांची पाहणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 September 2026

गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज; महापौर रितू तावडेंकडून विसर्जनस्थळांची पाहणी


मुंबई JPN NEWS - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विसर्जनस्थळांसह विविध नागरी सुविधांची तयारी पूर्ण केली असून, मुंबईकरांना सुरक्षित आणि सुविधाजनक गणेशोत्सवाचा अनुभव देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी शुक्रवारी मुंबईतील विविध विसर्जनस्थळांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौरांनी कुर्ला येथील शीतल तलाव, मुलुंडमधील मोरया तलाव, पवई तलाव, के-उत्तर विभागातील शामनगर तलाव आणि जुहू चौपाटी येथील विसर्जनस्थळांची पाहणी केली.

३८३ हून अधिक कृत्रिम तलावांची उभारणी - 
सहा फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबईत ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. तसेच सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी असलेल्या नैसर्गिक विसर्जनस्थळांवरील तलावांमधील गाळ आणि कचरा काढून स्वच्छता करण्यात आली आहे.

गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी मूर्तिकारांना शाडूची माती आणि पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून देण्यात आल्याचे महापालिकेने सांगितले. त्याचबरोबर रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्त्यालगतच्या झाडांची आवश्यक छाटणी आणि नागरिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

विसर्जनस्थळी सुविधांवर भर - 
विसर्जनस्थळी आवश्यकतेनुसार पुरेसे तराफे, पिण्याचे पाणी, जीवरक्षक तसेच पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र फिरती शौचालये उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर रितू तावडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. विसर्जनस्थळांवरील सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

उपमहापौर संजय घाडी यांनी विसर्जनस्थळांचे सुशोभीकरण, पुरेशा संख्येने जीवरक्षकांची नियुक्ती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व महापालिका प्रशासनामध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच विसर्जनस्थळी संकलित होणाऱ्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेबाबत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सूचनाही त्यांनी केली.

गणेशोत्सव काळात मुंबईकर, गणेशभक्त आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वंकष तयारी केली असून, यंदाचा उत्सव स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर वातावरणात पार पडेल, असा विश्वास महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS