
मुंबई JPN NEWS - ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि भाविकांच्या उत्साहात मुंबईत दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत एकूण ६१ हजार ६४० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
यामध्ये ३०१ सार्वजनिक गणेशमूर्ती आणि ६१ हजार २४७ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे. तसेच ९२ हरतालिका मूर्तींचेही विसर्जन करण्यात आले. गणरायाला निरोप देण्यासाठी विविध विसर्जनस्थळांवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
गणेशभक्तांनी पारंपरिक पद्धतीने आरती करून आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला. विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.
दीड दिवसांच्या विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे मुंबईतील विसर्जनाचा पहिला टप्पा शांततेत पार पडला.


No comments:
Post a Comment