
मुंबई JPN NEWS - पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला यंदा मुंबईकर गणेशभक्त आणि गणेश मंडळांनी मोठा प्रतिसाद दिला. यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईत विसर्जित झालेल्या एकूण मूर्तींपैकी तब्बल ९७.२७ टक्के गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ३८३ कृत्रिम तलावांमध्ये १ लाख ९२ हजार २३७ मूर्तींचे विसर्जन झाले.
बृहन्मुंबई क्षेत्रात यंदा एकूण १ लाख ९७ हजार ३८२ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींसाठी कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. या तलावांमध्ये विसर्जित झालेल्या मूर्तींमध्ये १ लाख २२ हजार ३९१ पीओपी, तर ६९ हजार ८४६ शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे.
सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्तींसाठी समुद्रकिनारे, चौपाट्या आणि इतर ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळांचा वापर करण्यात आला. या ठिकाणी एकूण ५ हजार ३८२ मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये ५ हजार २५९ पीओपी आणि १२३ शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे.
नैसर्गिक जलस्रोतांवरील पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी महापालिकेने यंदा कृत्रिम तलावांची संख्या आणि सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवली होती. नागरिकांना घराजवळील मोकळ्या जागा, उद्याने आणि मैदानांमध्येही विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या सुविधेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आल्याने विविध चौपाट्यांवरील विसर्जनाची गर्दी कमी होण्यास मदत झाली.
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने गणेशोत्सवापूर्वीच मूर्तिकारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मूर्तीनिर्मितीसाठी ९४० मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. त्याचबरोबर पर्यावरणपूरक मूर्तींसाठी २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग मोफत देण्यात आला.
गणेशमूर्ती विसर्जनाचा सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात केली होती. संपूर्ण विसर्जन व्यवस्थेसाठी २५ हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. कृत्रिम तलाव, विसर्जनस्थळांवरील सुरक्षा, निर्माल्य संकलन तसेच विसर्जनानंतर मूर्तींच्या साहित्याचे संकलन व व्यवस्थापन यावरही प्रशासनाने विशेष भर दिला.
महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईतील गणेशभक्त आणि गणेश मंडळांचे आभार मानले. आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपआयुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांच्या देखरेखीखाली यंदाची विसर्जन व्यवस्था राबविण्यात आली.
उच्च न्यायालयाचे निर्देश, महाराष्ट्र शासनाच्या सूचना तसेच केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. कृत्रिम तलावांना मिळालेला मोठा प्रतिसाद हा मुंबईतील विसर्जन व्यवस्थेतील महत्त्वाचा बदल मानला जात आहे.


No comments:
Post a Comment