
मुंबई JPN NEWS - महापालिकेच्या एफ नॉर्थ विभागातील ‘अभय योजने’च्या कामकाजावरून कथित गैरप्रकारांचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. नागरिकांकडून कथित आर्थिक वसुली तसेच बदलीचे आदेश झाल्यानंतरही बॅकडेटमध्ये सह्या करून कामकाज केल्याच्या आरोपांची गंभीर दखल घेत स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी तीन कॉलनी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे निर्देश प्रशासनाला दिले.
शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी एफ नॉर्थ विभागातील ‘अभय योजने’च्या कामकाजात कथित अनियमितता होत असल्याचा मुद्दा बैठकीत मांडला. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
संबंधित अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सुमारे दहा दिवसांपूर्वी देण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मात्र, बदलीचे आदेश झाल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी बॅकडेटमध्ये सह्या करून कामकाज केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे बदलीनंतरही त्यांना संबंधित कामकाज करण्याची परवानगी होती का, तसेच कोणती कागदपत्रे आणि व्यवहार त्यांच्या स्वाक्षरीने करण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर बदलीनंतर करण्यात आलेल्या सह्या, ‘अभय योजने’शी संबंधित कागदपत्रे आणि नागरिकांकडून करण्यात आल्याचा आरोप असलेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची दखल घेत प्रभाकर शिंदे यांनी एफ नॉर्थ विभागातील नितीन सारडा, श्रीकांत राठोड आणि अविनाश पवार या तीन कॉलनी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवरील आरोपांची प्रशासनाकडून चौकशी झाल्यानंतरच त्यांची प्रत्यक्ष भूमिका आणि कथित आर्थिक गैरप्रकारांची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती पुढील कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment