‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 September 2026

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी


मुंबई JPN NEWS - IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा आणि या प्रकरणातील संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीप्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने IIT मुंबईच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते व राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.

साहिल वाकोडे यांच्या मृत्यूनंतर IIT मुंबई प्रशासनाकडून त्यांच्याबाबत चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. कोणतेही ठोस पुरावे नसताना साहिल यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आणि त्यांचे चारित्र्यहनन झाल्याचेही त्यांनी म्हटले.

साहिल यांच्या न्यायासाठी मित्र आणि विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची आंबेडकर यांनी भेट घेऊन आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या लढ्यात आपण विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिष्टमंडळाने IIT मुंबई प्रशासनाशी चर्चा केली. साहिल वाकोडे यांच्याबाबत संस्थेकडून चुकीची माहिती देण्यात आली असल्यास प्रशासनाने त्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा दबाव आणू नये, अशी मागणीही प्रशासनासमोर करण्यात आली.

साहिल वाकोडे यांच्यावर करण्यात आलेल्या ‘चिटिंग’च्या आरोपांबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही सुजात आंबेडकर यांनी केली. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पुरावे आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका सम्यक विद्यार्थी आंदोलनाने व्यक्त केली. आंदोलनावेळी IIT मुंबई परिसरात विद्यार्थी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS