ठाणे रेल्वे स्थानकात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा जप्त; 61 बाटल्यांसह एकाला अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2026

ठाणे रेल्वे स्थानकात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा जप्त; 61 बाटल्यांसह एकाला अटक


ठाणे / मुंबई JPN NEWS - परराज्यातून, विशेषतः गोवा राज्यात निर्मित भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची रेल्वेमार्गे होणारी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत ठाणे रेल्वे स्थानकावर मोठा मद्यसाठा जप्त करण्यात आला. प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर मंगलुरु एक्सप्रेसमधून उतरत असलेल्या एका व्यक्तीकडून विविध ब्रँडच्या ६१ सीलबंद बाटल्या, एकूण ३६.८५ बल्क लिटर मद्य, असा ₹७१,५६० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २३ सप्टेंबर २०२६ रोजी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दारूबंदी गुन्ह्यांच्या अनुषंगाने गस्त घालण्यात येत होती. दुपारी सुमारे १२.१५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर मंगलुरु एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२१३४) मधून दोन बॅग घेऊन उतरणारा एक व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळून आला. अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून चौकशी केली.

चौकशीत त्याने आपले नाव शिवम छनबस मठपती असे सांगितले. तो रेल्वेमध्ये परिचारक (अटेंडंट) म्हणून काम करत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडील दोन बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित विविध ब्रँडचे विदेशी मद्य आढळून आले.

जप्त करण्यात आलेल्या मद्यामध्ये रॉयल चॅलेंज, ओल्ड मंक कॉफी रम, रॉयल ग्रीन, ऑकस्मिथ सनटोरी, बकार्डी गावा, ब्लॅक अॅन्ड व्हाइट, रॉयल स्टॅग, व्हॅट ६९ आणि ऑकस्मिथ गोल्ड यांसह विविध ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश आहे. दोन ट्रॅव्हल बॅगमधून हा मद्यसाठा आढळून आला.

या प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(ई) व १०८ अन्वये गुन्हा क्रमांक २५७/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपी शिवम छनबस मठपती याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची एक्साईज कस्टडी सुनावली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि ठाणे-१ चे अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ई विभाग, ठाणे-१ चे निरीक्षक आनंद अं. पवार, दुय्यम निरीक्षक पी. एम. खरबे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एच. एम. देवकते तसेच जवान एस. एस. पैठणकर आणि आर. एस. गोलतकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक पी. एम. खरबे करीत आहेत. रेल्वेमार्गे परराज्यातील मद्याची होणारी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई सुरू असल्याचे विभागाने सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS