
मुंबई JPN NEWS - विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधण्यासोबतच त्यांच्यामध्ये नैतिक मूल्ये, विवेक आणि माणुसकी रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करतात. त्यामुळे देशाचा बौद्धिक आणि नैतिक पाया भक्कम करण्यात शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार २०२५-२६’ वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पुढील वर्षापासून पुरस्काराची रक्कम ११ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्याची घोषणा केली.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात शनिवारी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या ५० उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
महापौर तावडे म्हणाल्या की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संगणक आणि सोशल मीडियाच्या अल्गोरिदममुळे आज माहितीचा प्रचंड साठा एका क्लिकवर उपलब्ध आहे. मात्र, एखाद्या निराश विद्यार्थ्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसून त्याला आत्मविश्वास देण्याचे काम कोणतेही तंत्रज्ञान करू शकत नाही. मशीन माहिती देऊ शकते; परंतु विद्यार्थ्यांच्या जीवनात विवेक, संवेदनशीलता आणि माणुसकी रुजविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्येच आहे.
‘विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि आनंदही महत्त्वाचा’ -
विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी आजच्या शिक्षकांनी केवळ परीक्षा घेणारे किंवा पाठांतर करवून घेणारे न राहता विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारे मार्गदर्शक बनले पाहिजे, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली. शिक्षण म्हणजे केवळ गुणांची चढाओढ नसून विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, आनंद आणि आत्मविश्वास टिकविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महानगरपालिका शाळांमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हुशार असण्याबरोबरच आनंदी, तणावमुक्त आणि संवेदनशील नागरिक बनावा, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षकांच्या पुरस्कार रकमेत वाढ -
महानगरपालिकेकडून आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना सध्या प्रत्येकी ११ हजार रुपये मानधन दिले जाते. शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याची मागणी केली. त्याला प्रतिसाद देताना महापौर रितू तावडे यांनी पुढील वर्षापासून ही रक्कम २५ हजार रुपये करण्यात येईल, अशी घोषणा केली. या घोषणेचे उपस्थित शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
महानगरपालिका शाळांतील शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे -
उपमहापौर संजय घाडी यांनी शिक्षण आणि शिक्षकांच्या योगदानामुळे गाव, शहर व देशाची जडणघडण होत असल्याचे सांगितले. मुंबईच्या विकासात महानगरपालिका शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद करत त्यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक असण्याबरोबरच पालकही असतो, असे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली तरी ती शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या. पुरस्कारासाठी झालेल्या मुलाखतींमध्ये शिक्षकांनी सादर केलेले उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष यामिनी जाधव यांनी महानगरपालिका शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले. उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनीही शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक राबवत असलेल्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष यामिनी जाधव, प्रभाग समिती अध्यक्ष आकाश पुरोहित, नगरसेविका उर्मिला पांचाळ, राजेश्री भाटणकर, मेहजाबीन अतीक अहमद खान, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक दत्तात्रेय वारे गुरुजी, उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे आणि कीर्तीवर्धन किरीतकुडवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
५० उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान -
सन २०२५-२६ च्या आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी महानगरपालिकेच्या प्राथमिक, विशेष आणि माध्यमिक शाळांसह खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यातून निवड झालेल्या ५० उपक्रमशील शिक्षकांना या सोहळ्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


No comments:
Post a Comment