Mumbai Crime वांद्रे पश्चिमेत दीड किलो चरस जप्त; गुन्हे शाखेकडून ४० वर्षीय आरोपीला अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 October 2026

Mumbai Crime वांद्रे पश्चिमेत दीड किलो चरस जप्त; गुन्हे शाखेकडून ४० वर्षीय आरोपीला अटक


मुंबई JPN NEWS - मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने वांद्रे पश्चिम परिसरात कारवाई करत १ किलो ५०५ ग्रॅम चरस जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार या अंमली पदार्थाची किंमत सुमारे १ कोटी ५० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून, अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.

गुन्हे शाखा युनिट ९, वांद्रे पश्चिम येथील पथकाला २४ ऑक्टोबर २०२६ रोजी वांद्रे पश्चिम परिसरातील एका घरातून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची दखल घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत संबंधित घरावर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान घरातून १ किलो ५०५ ग्रॅम वजनाचा चरस जप्त करण्यात आला. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अंमली पदार्थ ताब्यात घेतला. या प्रकरणी अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात एका ४० वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. जप्त करण्यात आलेला चरस कुठून आणण्यात आला होता आणि त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, यासह अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा तपास केला जात आहे.

ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील आणि विजय धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील व ऋषिकेश बाबर यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS