
मुंबई JPN NEWS - मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकल वाहतुकीत सोमवारी सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे अडथळे निर्माण झाले. ठाणे-मुलुंड आणि कांजूरमार्ग-भांडुप या दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अप आणि डाउन दिशेच्या फास्ट तसेच स्लो मार्गांवरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. गाड्या संथगतीने चालवण्यात येत असून, बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
रेल्वे नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान तसेच कांजूरमार्ग आणि भांडुप स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे दोन्ही दिशांच्या फास्ट आणि स्लो मार्गांवरील लोकल सेवांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. गाड्या संथगतीने धावत असल्याने प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी विलंब होत आहे.
दरम्यान, सकाळी ठाणे-मुलुंडदरम्यान डाउन लोकल मार्गावरील ओव्हरहेड वायरला अज्ञात वस्तू लटकत असल्याची माहितीही रेल्वे प्रशासनाने दिली होती. मात्र, या घटनेचा सिग्नल बिघाडाशी थेट संबंध आहे का, हे स्पष्ट झालेले नाही.
लोकल उशिराने धावत असल्याने विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली. कामावर जाणाऱ्या नोकरदारांना विलंबाचा फटका बसत असून, वेळेत कार्यालयात पोहोचण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्तीचे काम सुरू असून, लोकल सेवा पूर्ववत होण्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे.


No comments:
Post a Comment