मुंबईत ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’चा शुभारंभ; वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृतीवर भर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2026

मुंबईत ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’चा शुभारंभ; वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृतीवर भर


मुंबई JPN NEWS - राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’चा शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ‘निवासस्थानांना जोडणे, वन्यजीवांची भरभराट’ (Connecting Habitats, Thriving Wildlife) या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती आणि शैक्षणिक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे.

या शुभारंभप्रसंगी प्राणिसंग्रहालयाच्या उपसंचालक डॉ. कोमल राऊळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवानंद शिरसाट आणि जीवशास्त्रज्ञ डॉ. अभिषेक साटम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि वन्यवाणी फाउंडेशनच्या संकल्पनेतून व सहआयोजनातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात दुर्मीळ प्राणी व पक्ष्यांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन केले जाते. यासोबतच नागरिक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींमध्ये वन्यजीवांविषयी आपुलकी व संवेदनशीलता निर्माण करणे हा महोत्सवाचा उद्देश आहे.

विद्यार्थी, पर्यटकांसाठी विविध उपक्रम - 
महोत्सवाच्या कालावधीत विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी दररोज विशेष कार्यशाळा, माहिती प्रदर्शन, वन्यजीवांवरील माहितीपट आणि अभ्यासकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमांमधून वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विविध संस्थांचा सहभाग - 
महोत्सवात विविध स्वयंसेवी आणि पर्यावरण क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून माहिती प्रदर्शन उभारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, जेन गुडॉल इन्स्टिट्यूट, वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, सीड स्टोरीज, ग्रीन वर्क ट्रस्ट, सृष्टिज्ञान, गोदरेज, असर, क्लायमेट कल्चर कलेक्टिव्ह, अरेण्य, प्रोजेक्ट मुंबई आणि वनभाषी या संस्थांचा यात सहभाग आहे.

प्रदर्शनामध्ये सहभागी संस्थांच्या पर्यावरण व वन्यजीव संवर्धनातील कार्याची माहिती देणारी छायाचित्रे, माहिती फलक आणि शास्त्रीय नमुने प्रदर्शित करण्यात आले आहेत.

विद्यार्थी, अभ्यासक आणि निसर्गप्रेमींनी या महोत्सवातील विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS