
मुंबई | JPN NEWS -
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांसाठी महत्त्वाचे असलेले RailOne ॲप सलग दुसऱ्या दिवशीही तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याने ऑनलाइन तिकीट बुकिंग पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी, हजारो प्रवाशांना स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा लावून तिकीट काढावे लागत असून, त्यांच्या वेळेचा मोठा अपव्यय होत आहे.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲपमध्ये यापूर्वी बुक केलेले मासिक आणि सीझन पास दिसत असले तरी नवीन तिकीट किंवा पास बुक करता येत नाही. त्यामुळे ऑनलाइन सेवांवर अवलंबून असलेल्या नियमित प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
ॲप बंद असल्याने अनेक स्थानकांवर तिकीट खिडक्यांसमोर गर्दी वाढली असून, कार्यालयीन वेळेत प्रवाशांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना कामावर किंवा इतर ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
दरम्यान, काही प्रवासी वेळेअभावी तिकीट न काढताच प्रवास करत असल्याचे चित्रही दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होत असून, तिकीट तपासणीदरम्यान प्रवासी आणि रेल्वे प्रशासनामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सलग दुसऱ्या दिवशीही RailOne ॲपची सेवा पूर्ववत न झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणेकडून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. प्रवाशांनी मात्र रेल्वे प्रशासनाने तातडीने समस्या दूर करून ऑनलाइन तिकीट सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी केली आहे.
ही बातमीही वाचा -
Rail One App मध्ये तांत्रिक बिघाड; तिकीट बुकिंग ठप्प, प्रवाशांचा खोळंबा


No comments:
Post a Comment