दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2026

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी


मुंबई JPN NEWS - राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी/SSC) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी/HSC) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत.

मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे.

ऑनलाइन आवेदनपत्रे शुल्काशिवाय भरून घेणार - 
या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळावा यासाठी संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना विभागीय मंडळांना देण्यात आल्या आहेत.

सविस्तर सूचना स्वतंत्रपणे -
परीक्षा शुल्क माफीसंदर्भातील पुढील सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार आहेत. सर्व विभागीय मंडळांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत तात्काळ सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने राज्य मंडळाकडे सादर करण्यासही विभागीय मंडळांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आगामी बोर्ड परीक्षेसाठी आर्थिक दिलासा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS