महापालिका विधी खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; किशोरी पेडणेकरांकडून चौकशीची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2026

महापालिका विधी खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; किशोरी पेडणेकरांकडून चौकशीची मागणी


मुंबई JPN NEWS - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याच्या कामकाजाबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा करत, या तक्रारींची तातडीने चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी महापालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांनी केली आहे. विधी खात्यातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कथित छळवणूक, जाचक कार्यपद्धती, अतिरिक्त प्रशासकीय कार्यभार आणि कार्यालयीन समन्वयाच्या अभावाबाबत लेखी तक्रारी केल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.

पेडणेकर यांच्या म्हणण्यानुसार, प्राप्त तक्रारींमध्ये विधी खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कथितपणे होत असलेल्या छळवणुकीचा त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. न्यायालयीन कामकाजासोबतच अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त प्रशासकीय जबाबदाऱ्या सोपविल्या जात असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

वरिष्ठ पातळीवरील समन्वयाच्या अभावाचा आरोप

संयुक्त कायदा अधिकारी, उप कायदा अधिकारी, सहाय्यक कायदा अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत वरिष्ठ पातळीवरून पुरेसा संवाद आणि समन्वय नसल्याची तक्रार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी पुरेशी चर्चा न करता बदल्या केल्या जात असल्याने विधी खात्याच्या कामकाजात व्यत्यय निर्माण होत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

विधी खात्याचे काम हे महापालिकेच्या विविध न्यायालयीन प्रकरणांशी आणि प्रशासकीय निर्णयांशी संबंधित असल्याने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.

६५ कोटींच्या आर्थिक दायित्वाचा मुद्दा

दरम्यान, विधी खात्याच्या कामकाजाशी संबंधित एका प्रकरणात महापालिकेवर सुमारे ६५ कोटी रुपयांचे आर्थिक दायित्व निर्माण झाल्याचा मुद्दाही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, एका सल्लागार कंपनीच्या सुमारे १३ कोटी रुपयांच्या देयकाच्या विलंबासंदर्भात न्यायालयीन दावा करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित प्रकरणात महापालिकेला सुमारे ६५ कोटी रुपयांचा भरणा करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महापालिकेच्या मालमत्ता आणि बँक ठेवींवर जप्तीच्या कारवाईच्या अनुषंगानेही न्यायालयीन आदेश पारित झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संबंधित सल्लागार कंपनीला २४ सप्टेंबरपर्यंत रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आल्याकडेही पेडणेकर यांनी लक्ष वेधले.

विधी खात्याचा सखोल आढावा घेण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने विधी खात्याच्या एकूण कामकाजाचा सखोल आढावा घ्यावा, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे.

यासोबतच न्यायालयीन कामकाज, प्रशासकीय समन्वय, मनुष्यबळाचे नियोजन आणि संबंधित न्यायालयीन प्रकरणांतील निर्णयप्रक्रियेचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS