
मुंबई - विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप-महायुतीने साम, दाम, दंड आणि भेद या सर्व नीतींचा वापर करून विजय मिळवल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. आजचा निकाल हा ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’ या म्हणीचे उदाहरण असल्याची टीकाही त्यांनी केली.
निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत निवडणुका निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात व्हायला हव्यात. मात्र गेल्या काही वर्षांपासून सत्ताधारी पक्ष प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेचा गैरवापर करून निवडणुका जिंकत असल्याचे चित्र दिसत आहे. विरोधी पक्षांचे उमेदवार फोडणे, अर्ज बाद करणे किंवा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणणे, असे प्रकार विधान परिषद निवडणुकीतही पाहायला मिळाल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजप स्वतःला देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेत असला तरी उमेदवारांसाठी इतर पक्षांत फोडाफोडी करावी लागत असल्याची टीका करत सपकाळ यांनी भाजप ‘वन नेशन, वन पार्टी’च्या दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हटले. आधी विरोधी पक्ष आणि नंतर मित्रपक्ष संपवण्याचा डाव सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस पक्ष लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी निवडणुका लढत असून सत्तेचा आणि पैशाचा वापर करून निवडणुकीत प्रभाव टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्येक मतदाराला पाच लाख रुपयांपर्यंतची आमिषे दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोपही सपकाळ यांनी केला.
विधान परिषद निवडणुकीतील पराभवाची समीक्षा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची समिती लवकरच नेमण्यात येणार असल्याचे सांगत, काँग्रेसची लोकशाही व संविधान रक्षणाची लढाई पुढेही सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.


No comments:
Post a Comment