लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरांचा धुमाकूळ; 192 मोबाईल चोरीच्या तक्रारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 September 2026

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरांचा धुमाकूळ; 192 मोबाईल चोरीच्या तक्रारी


मुंबई JPN NEWS - लालबागच्या राजाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीला यंदाही लाखो भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, या प्रचंड गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान तब्बल 192 मोबाईल चोरी किंवा हरवल्याच्या प्रकरणांची नोंद पोलिसांकडे झाली असून, मोबाईल, सोनसाखळी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एका अल्पवयीन मुलासह 18 जणांना अटक केली आहे.

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी झाले होते. गर्दीच्या ठिकाणी भाविकांचे लक्ष विचलित करून त्यांच्या खिशातील मोबाईल, बॅग तसेच अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्या. मिरवणुकीनंतर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल चोरीच्या सुमारे 200 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 192 प्रकरणांची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

मोबाईल चोरीसोबतच सोनसाखळी आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी 10 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या संशयित टोळ्यांविरोधात कारवाई सुरू केली.

पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. प्राथमिक तपासात या चोरीच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांसह तरुण आणि महिलांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. गर्दीमध्ये भाविकांच्या बॅग आणि मौल्यवान वस्तूंवर हात साफ करताना दोन महिलांना पकडण्यात आल्याची माहिती आहे.

अटक केलेल्या संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून मुंबईतील विविध भागांमध्ये सक्रिय असलेल्या चोरीच्या टोळ्यांबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून आतापर्यंत 14 चोरीचे मोबाईल फोन आणि सात सोनसाखळ्या जप्त केल्या आहेत.

दरम्यान, मिरवणुकीदरम्यान चोरीला गेलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची नोंद झालेल्या तक्रारींशी पडताळणी केली जात आहे.

चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. संशयितांच्या हालचाली आणि त्यांच्यातील संपर्काचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक तपास तसेच सायबर सेलची मदत घेतली जात आहे.

अटक केलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या कथित साथीदारांचा शोधही घेतला जात आहे. गर्दीच्या ठिकाणी टोळीच्या स्वरूपात काम करून भाविकांना लक्ष्य करण्यात आले असावे, असा पोलिसांचा संशय आहे.

पोलिसांची विविध पथके अधिक संशयितांचा शोध घेण्यासाठी तसेच चोरीला गेलेला उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता असून, तपासातून चोरीच्या घटनांमागील टोळीचे अधिक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS