मुंबई JPN NEWS - मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय अर्थात राणीबागेची सफर आता महागण्याची शक्यता आहे. पशुपक्ष्यांची देखभाल, खाद्य, वैद्यकीय सुविधा आणि उद्यानातील विविध प्रकल्पांचा वाढता खर्च लक्षात घेता महापालिकेने प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे.
सध्या राणीबागेत लहान मुलांसाठी २५ रुपये आणि प्रौढांसाठी ५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. प्रस्तावित दरानुसार हे शुल्क थेट दुप्पट होण्याची शक्यता असून, मुलांसाठी ५० रुपये तर प्रौढांसाठी १०० रुपये मोजावे लागू शकतात. त्यामुळे कुटुंबासह राणीबागेची सफर करणाऱ्या मुंबईकरांच्या पर्यटनाच्या बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे.
दररोज हजारो पर्यटकांची गर्दी -
पेंग्विन, वाघ, सिंहांसह विविध पशुपक्ष्यांना पाहण्यासाठी राणीबागेत दररोज सुमारे ६ ते ७ हजार पर्यटक भेट देतात. २०१७ मध्ये पेंग्विनचे आगमन झाल्यानंतर राणीबागेच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. सध्या येथे बिबट्या, कोल्हे, तरस, अस्वल यांसह सुमारे ३८२ प्राणी-पक्षी आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल २५ लाख ४२ हजार १३५ पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यातून महापालिकेला ९ कोटी ८५ लाख ८७ हजार रुपये महसूल मिळाला.
चालू आर्थिक वर्षातही पर्यटकांचा ओघ कायम आहे. एप्रिल २०२६ मध्ये १ लाख ९१ हजार ६१५ पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली आणि त्यातून ७५ लाख ३९ हजार रुपये महसूल मिळाला. मे महिन्यात पर्यटकांची संख्या वाढून ३ लाख १० हजार ६५४ झाली आणि त्यातून १ कोटी २० लाख ४१ हजार रुपये महसूल मिळाला.
वाढत्या खर्चामुळे दरवाढीचे नियोजन -
राणीबागेतील पशुपक्ष्यांचे खाद्य, पशुवैद्यकीय उपचार, अधिवास व पिंजऱ्यांची देखभाल, स्वच्छता आणि सुरक्षाव्यवस्थेवर मोठा खर्च होत आहे. त्याचबरोबर राणीबागेचा विस्तार, मुलुंडमधील प्रस्तावित पक्षी उद्यान आणि मत्स्यालयासारख्या प्रकल्पांमुळे भविष्यातील देखभाल खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महसूलवाढीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते.
पर्यटक वाढले, मग तिकीट दरही वाढणार? -
राणीबागेत पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असताना प्रवेश शुल्क दुप्पट करण्याच्या प्रस्तावामुळे मुंबईकरांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. विशेषतः चार-पाच जणांच्या कुटुंबाला राणीबागेची सफर करायची झाल्यास प्रवेश शुल्काचा खर्च वाढणार आहे. अनेक मुंबईकरांसाठी राणीबाग हे कुटुंबासह फिरण्यासाठीचे परवडणारे ठिकाण मानले जाते. त्यामुळे दरवाढ झाल्यास ‘पेंग्विनची धमाल आणि वाघ-सिंहांची डरकाळी पाहण्यासाठी आता खिशाला चाट’ बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


No comments:
Post a Comment