स्मार्ट मीटरच्या वाढीव वीज बिलांच्या तक्रारींसाठी बेस्टची विशेष मोहीम, जागेवरच मीटर तपासणीची सुविधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2026

स्मार्ट मीटरच्या वाढीव वीज बिलांच्या तक्रारींसाठी बेस्टची विशेष मोहीम, जागेवरच मीटर तपासणीची सुविधा


मुंबई JPN NEWS - स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनपेक्षितपणे वाढीव वीज बिले येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे ग्राहकांच्या बिलांबाबतच्या शंका दूर करण्यासोबतच स्मार्ट मीटरची अचूकता तपासून तक्रारींचे शक्य तितक्या लवकर निराकरण करण्यात येणार आहे.

या विशेष मोहिमेंतर्गत बेस्टच्या विविध ग्राहक सेवा कार्यालयांमध्ये ‘स्मार्ट मीटर आणि बिलिंग हेल्प डेस्क’ उभारण्यात येणार आहेत. ग्राहकांच्या तक्रारींचे मंजूर प्रमाणित कार्यपद्धतीनुसार (SOP) निराकरण केले जाणार असून, बेस्टची पथके ग्राहकांच्या उपस्थितीत स्मार्ट मीटरची जागेवर तपासणी करणार आहेत.

स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत शंका असल्यास बेस्टच्या पथकांकडून ‘तपासणी मीटर’ बसविण्यात येणार आहे. या माध्यमातून स्मार्ट मीटर आणि तपासणी मीटरमधील वीज वापराची तुलना करून ग्राहकांच्या तक्रारीची पडताळणी केली जाणार आहे.

मोहिमेदरम्यान ग्राहकांना ‘mi BEST’ मोबाईल अॅप वापरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, स्मार्ट मीटरमधील ToD (Time of Day) वीजदराचा वापर आणि त्याच्या फायद्यांची माहितीही दिली जाणार आहे. तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर ग्राहकांना अभिप्राय अर्जाद्वारे आपला अभिप्राय नोंदविता येणार आहे.

या मोहिमेची सुरुवात २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ रोजी ए आणि ई वॉर्डमधून होणार आहे. त्यानंतर ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी बी आणि एफ/द वॉर्डमध्ये मोहीम राबविण्यात येईल.

५ आणि ६ ऑक्टोबर रोजी सी आणि एफ/उ वॉर्डमध्ये, तर ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी डी आणि जी/द वॉर्डमध्ये ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. जी/उ वॉर्डसाठी ८ आणि ९ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान संबंधित ग्राहक सेवा कार्यालयांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत.

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर असामान्यपणे जास्त वीज बिल आलेल्या ग्राहकांनी निर्धारित दिवशी आपल्या संबंधित ग्राहक सेवा कार्यालयाला भेट द्यावी. तक्रारीच्या निवारण प्रक्रियेला गती मिळण्यासाठी ग्राहकांनी नवीनतम स्मार्ट मीटरचे वीज बिल आणि स्वतःचे ओळखपत्र सोबत आणावे, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS