
मुंबई JPN NEWS - राज्यातील युवक-युवतींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ २९ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट येथे या उपक्रमाचा शुभारंभ होईल.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी कोकण आणि नाशिक विभागातील विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत कोकण आणि नाशिक विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये ४१८ हून अधिक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.
या रोजगार मेळाव्यांमधून २५ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, १ हजार ५०० हून अधिक कंपन्या आणि आस्थापना सहभागी होणार आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभव यानुसार उपलब्ध रिक्त पदांशी त्यांची जुळवणी करण्यात येणार आहे.
युवक-युवतींना मुलाखतीसाठी तयार करण्याच्या उद्देशाने संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि सॉफ्ट स्किल्सचे प्लेसमेंटपूर्व प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधींसोबतच विविध उद्योगांमध्ये आवश्यक असलेली कौशल्ये आणि करिअरच्या संधींची माहिती उमेदवारांना मिळणार आहे.
‘लाडक्या बहिणीं’साठी विशेष रोजगार मेळावा -
एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सुमारे ६०० ते ७०० महिला उमेदवार सहभागी होण्याची अपेक्षा आहे. विविध कंपन्यांच्या स्टॉलवर उपलब्ध पदे, पात्रता, कामाचे स्वरूप, वेतन आणि भरती प्रक्रियेची माहिती महिलांना थेट मिळणार असून, कंपनी प्रतिनिधींशी संवाद साधून मुलाखती देण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.
रोजगार महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार आणि उद्योजकांना QR कोडच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इच्छुकांनी स्थानिक आयटीआय किंवा जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.


No comments:
Post a Comment