
मुंबई JPN NEWS - गोरेगाव पश्चिमेतील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळील शिवशंकर नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयात दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मृत्यूमागे विषारी वायू किंवा रासायनिक पदार्थांचा संबंध आहे का, याची वैज्ञानिक पद्धतीने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
किशोरी पेडणेकर यांनी २७ सप्टेंबर रोजी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणांनी घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी केली.
स्थानिकांकडून सार्वजनिक शौचालयाच्या शेजारी रासायनिक पदार्थांचा वापर करणारा कारखाना असल्याची माहिती मिळत असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. त्यामुळे घटनेच्या वेळी कारखान्यात कोणते रसायन वापरले जात होते, कोणती प्रक्रिया सुरू होती आणि त्यातून धूर अथवा विषारी वायू बाहेर पडला होता का, याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच संबंधित कारखान्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई महापालिका, अग्निशमन दल आणि अन्य संबंधित प्राधिकरणांच्या आवश्यक परवानग्या आहेत का, रासायनिक पदार्थ हाताळण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे का आणि नियमांचे पालन केले जाते का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता, वायुवीजन, देखभाल आणि सुरक्षिततेबाबत यापूर्वी तक्रारी झाल्या असल्यास त्यांची नोंद आणि प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचीही चौकशी करावी, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, घटनास्थळावरील रासायनिक आणि पर्यावरणीय नमुने तपासून मृत्यूचे नेमके कारण शोधावे, तसेच विषारी वायूचा संभाव्य स्रोत आणि घटनेशी संबंधित सर्व परिस्थिती तपासावी, अशी मागणी त्यांनी केली.
मृत्यूचे अंतिम कारण तपासातून स्पष्ट होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही, असेही पेडणेकर यांनी स्पष्ट केले. मात्र, तपासात निष्काळजीपणा किंवा नियमभंग आढळून आल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment