महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार - मुख्यमंत्री फडणवीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2026

महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार - मुख्यमंत्री फडणवीस


मुंबई JPN NEWS - बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून युवकांनी सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. जगातील २८ हून अधिक देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी असून, महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

एसएनडीटी महिला विद्यापीठात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचा’ कोकण आणि नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे रोजगार मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.

४१८ ठिकाणी एकाचवेळी रोजगार मेळावे - 
कोकण आणि नाशिक विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये ४१८ ठिकाणी एकाचवेळी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी एक लाखांहून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली आहे. तसेच १,५०० पेक्षा अधिक उद्योजक व नियोक्त्यांनी सहभाग नोंदवला असून, त्यांच्या माध्यमातून २५ हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्थानिक प्रशासन आणि विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून उमेदवार आणि नियोक्त्यांना जोडण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.

शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराची त्रिसूत्री - 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशातील युवा शक्तीला रोजगारक्षम बनविण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालणे आवश्यक आहे. भारताच्या विकसित राष्ट्राच्या उद्दिष्टासाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती महत्त्वाची आहे.

देशातील सुमारे ६५ टक्के लोकसंख्या कार्यक्षम युवाशक्ती आहे. एका बाजूला उद्योगांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे, तर दुसऱ्या बाजूला तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे. या दोन्ही घटकांना जोडणारा दुवा म्हणून रोजगार मेळावे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

एआय, सेमीकंडक्टर आणि क्वांटम कॉम्प्युटिंगसारख्या क्षेत्रांमध्ये वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे युवकांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार सातत्याने ‘अपस्किलिंग’ करून नवीन कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

‘रोजगार महाकुंभाची ही सुरुवात आहे’ – मंगल प्रभात लोढा
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रोजगार मेळाव्याला ‘रोजगार महाकुंभाची सुरुवात’ असे संबोधत हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसल्याचे स्पष्ट केले.

लोढा म्हणाले, “आज रोजगार महाकुंभाची सुरुवात झाली आहे; हा शेवट नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक युवक-युवतीला रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देईपर्यंत आमचे प्रयत्न थांबणार नाहीत.”

महाराष्ट्रातील युवाशक्तीला कौशल्य, संधी आणि रोजगाराशी जोडणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केवळ आयटीआयमधील विद्यार्थ्यांपुरते रोजगार मेळावे मर्यादित ठेवण्यात आलेले नाहीत. सर्व स्तरांतील तरुणांसाठी प्रत्येक तालुक्यात किमान तीन लहान रोजगार मेळावे आयोजित केले जात असल्याची माहिती लोढा यांनी दिली.

६१ हजार युवकांना मोफत पूर्व-रोजगार प्रशिक्षण -
केवळ रोजगार मेळावे आयोजित न करता युवकांना प्रत्यक्ष रोजगार मिळण्यासाठी पूर्वतयारी करून घेण्यावरही भर देण्यात येत आहे. त्यासाठी ७ दिवसांचे मोफत पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्यात आले असून, आतापर्यंत ६१ हजार युवक-युवतींनी हे प्रशिक्षण घेतले आहे.

या रोजगार महाकुंभासाठी १ लाखांहून अधिक तरुणांनी नोंदणी केली असून, त्यापैकी किमान ७० टक्के युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराशी जोडण्याचे लक्ष्य असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

‘रोजगारासाठी केवळ राज्यातच नव्हे, तर जगभर संधी’ -
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्राने गुंतवणूक आणि स्टार्टअप क्षेत्रात स्थान निर्माण केले असल्याचे सांगितले. तरुणांना राज्य आणि देशाबरोबरच परदेशातही रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी आवश्यक भाषा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्याची तयारी सरकारने केली असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांची संख्या वाढत असताना त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग कौशल्य विकास विभागासोबत काम करत असल्याचे सांगितले.

महिलांसाठी विशेष रोजगार मेळावा -
महिलांच्या रोजगार सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र विशेष महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योग, कंपन्या आणि सेवा क्षेत्रातील आस्थापनांचा सहभाग होता.

या उपक्रमात ३६ उद्योजकांनी सहभाग नोंदवला. महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध शासकीय महामंडळांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉलही उपलब्ध करून देण्यात आले.

नियुक्तीपत्रांचे वितरण -
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहीदा परमाणिक यांना क्रेवा कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, बेलापूर आणि कांती शंभू चव्हाण यांना क्रेवा कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, कुर्ला या कंपन्यांकडून नियुक्तीपत्र देण्यात आले.

रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींवर भर - 
या रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि उद्योगांच्या गरजेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कामगार विभाग, उद्योग विभाग, पणन विभाग, एमआयडीसी, विद्यापीठे आणि औद्योगिक संघटनांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

युवकांना केवळ नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठीही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS