रविवारी मध्य रेल्वेचा Mega Block; मुख्य व ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवेत बदल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 June 2026

रविवारी मध्य रेल्वेचा Mega Block; मुख्य व ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवेत बदल


मुंबई, २७ जून : मध्य रेल्वेवर रविवारी (२८ जून) विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, मुख्य मार्ग आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवेत मोठे बदल करण्यात आले आहेत. काही लोकल गाड्या जलद मार्गावर वळविण्यात येणार असून, अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगा ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावरून धावतील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील.

ठाण्याहून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकलही मुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत लोकल गाड्या सुमारे १५ मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.

दरम्यान, ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांना सर्वाधिक फटका बसणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत ठाणे–वाशी–नेरुळ दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणे, वाशी, नेरुळ आणि पनवेलदरम्यान धावणाऱ्या अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages