
मुंबई, दि. ६ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, मुंबईकरांनी प्रशासनाला दिलेले सहकार्य आणि महापालिका तसेच इतर शासकीय यंत्रणांनी केलेले अहोरात्र काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अविनाश ढाकणे, सभागृह नेते गणेश खणकर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोढा म्हणाले की, अवघ्या एका दिवसात ३५० हून अधिक झाडे उन्मळून पडण्यासारखी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करत रस्त्यांवरील झाडे हटवली, पाण्याचा निचरा केला आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सरकारी कार्यालयांनाही अर्धा दिवस सुट्टी देण्यात आली, जेणेकरून कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचता येईल, असे त्यांनी सांगितले.
मुंबई थांबलेली नसून लोकल रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. काही ठिकाणी रेल्वेचा वेग कमी असला तरी शहरातील जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र मैदानात उतरून काम करत असल्याचे सांगत, संकटकाळात राजकारण न करता त्यांच्या कार्याचे कौतुक करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही लोढा यांनी केले.
ताशी ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना व्हॉट्सॲपद्वारे सतर्कतेचे संदेश पाठविण्यात आले असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


No comments:
Post a Comment