
मुंबई JPN NEWS - अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईत होणाऱ्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सर्वंकष तयारी केली आहे. मुंबईत ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळांसह २७८ ठिकाणी ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेचे २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी विविध ठिकाणी तैनात राहणार आहेत.
विसर्जन स्थळांवर आवश्यक साधनसामग्रीही सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये १ हजार १९४ स्टील प्लेट, २३ जर्मन तराफे, ३४ क्रेन, ८५ रुग्णवाहिका आणि १० मोटरबोटचा समावेश आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी १ हजार १३२ जीवरक्षक तैनात करण्यात आले असून, विसर्जन स्थळांवर ६ हजार ५२ फ्लडलाईट आणि सर्चलाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी निर्माल्य व्यवस्थापनावरही विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी शहरातील विविध विसर्जन स्थळांवर ४९८ निर्माल्य कलश आणि ३२६ निर्माल्य डंपर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गर्दी आणि नियंत्रण व्यवस्थेसाठी २६१ स्वागत कक्ष, २२८ नियंत्रण कक्ष आणि ७५ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी ४८९ तात्पुरती प्रसाधनगृहे तसेच आवश्यक प्रकाशयोजना आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सहा फुटांपर्यंतच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक आहे. त्यासाठी पालिकेने पुरेशी व्यवस्था केली आहे. दरम्यान, आगमन आणि विसर्जन मार्गावरील ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे तसेच १७१ ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती करण्यात आली आहे. विसर्जन मार्गावरील २८१ ठिकाणच्या अडथळा निर्माण करणाऱ्या केबल्स हटविण्यात आल्या असून, ५१५ ठिकाणी वृक्षछाटणी करण्यात आली आहे.
गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था -
स्वराज्यभूमी अर्थात गिरगाव चौपाटी येथे अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. येथे १२ कृत्रिम तलाव, २० निरीक्षण मनोरे, २२ तराफे आणि ९० तात्पुरती प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विसर्जन व्यवस्थेसाठी सुमारे २ हजार मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. तसेच एक प्राथमिक आरोग्य केंद्र, तीन रुग्णवाहिका, ५४८ फ्लडलाईट आणि ११ सर्चलाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.
गिरगाव चौपाटीवर समन्वय कक्ष, पार्किंग व्यवस्था आणि शामियान्याचीही सुविधा करण्यात आली आहे. लाखो भाविकांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
आपत्कालीन व्यवस्थापनासाठी विशेष नियंत्रण कक्ष -
गिरगाव चौपाटीवर यंदा प्रथमच व्यापक स्वरूपात ‘आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष’ (Emergency Management Control Room) कार्यरत करण्यात येणार आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास विविध यंत्रणांमध्ये तातडीने समन्वय साधता यावा, हा या कक्षाचा उद्देश आहे.
या नियंत्रण कक्षात पालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे अधिकारी, मुंबई पोलीस, मुंबई अग्निशमन दल, आरोग्य विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक तसेच अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे हॅम रेडिओ चालक उपस्थित राहणार आहेत. समन्वय आणि संदेशवहनासाठी भ्रमणध्वनी, डिजिटल मोबाईल रेडिओ आणि हॅम रेडिओ यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे देखरेख -
गिरगाव चौपाटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी नियंत्रण कक्षात स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनादरम्यान दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थितीची माहिती तातडीने मिळावी यासाठी दोन ड्रोनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षामार्फत पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, किनारी सुरक्षा यंत्रणा आणि अन्य संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.
‘एक गणपती, एक झाड’ उपक्रम -
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक गणपती, एक झाड’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई महापालिका हद्दीत विसर्जित होणाऱ्या श्रीगणेशमूर्तींच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. गणेशोत्सवाला वृक्षसंवर्धनाची जोड देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
शाडू माती आणि पर्यावरणपूरक रंगांचे मोफत वाटप -
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी मूर्तिकारांना आतापर्यंत ९४० मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती मोफत वितरित करण्यात आली आहे. यंदा २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंगही विनामूल्य देण्यात आले आहेत.
गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण -
आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करता यावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक मंडळातील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना प्रथम प्रतिसादक आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यामध्ये प्रथमोपचार आणि सीपीआरचे प्रात्यक्षिकही देण्यात आले. यंदा एकूण ७२५ स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
नागरिकांना खबरदारीचे आवाहन -
समुद्रकिनारी ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’ आणि ‘स्टिंग रे’चा वावर लक्षात घेता नागरिकांनी समुद्रात उतरताना विशेष खबरदारी घ्यावी, तसेच महानगरपालिका आणि पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आतापर्यंत १ लाख ६३ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन -
यंदाच्या गणेशोत्सवात आतापर्यंत एकूण १ लाख ६३ हजार ३८६ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. दीड दिवसाच्या उत्सवात २९३ सार्वजनिक, ६२ हजार ९२७ घरगुती आणि ९२ हरतालिकांच्या मूर्तींसह एकूण ६३ हजार ३१२ मूर्तींचे विसर्जन झाले.
पाच दिवसांच्या उत्सवात १ हजार २० सार्वजनिक, ३५ हजार ८४३ घरगुती आणि १२९ हरतालिकांच्या मूर्तींसह एकूण ३६ हजार ९९२ मूर्तींचे विसर्जन झाले. सहा दिवसांच्या गौरी-गणपती उत्सवात ३०५ सार्वजनिक, ३८ हजार ४३८ घरगुती आणि ५ हजार ५१८ गौरींसह एकूण ४४ हजार २६१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
सात दिवसांच्या उत्सवात १ हजार ७७८ सार्वजनिक, १६ हजार ६०६ घरगुती आणि ४३७ गौरींसह एकूण १८ हजार ८२१ मूर्तींचे विसर्जन झाले. आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment