मुंबई विमानतळावर ९.४० किलो परदेशी सोन्याची तस्करी उघड; तिघांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 September 2026

मुंबई विमानतळावर ९.४० किलो परदेशी सोन्याची तस्करी उघड; तिघांना अटक


मुंबई JPN NEWS - दुबईहून मुंबईत आलेल्या तीन प्रवाशांकडून परदेशी बनावटीचे सोन्याची पावडर जप्त करून महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) तस्करीचा प्रकार उघडकीस आणला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २३ सप्टेंबरच्या पहाटे ही कारवाई करण्यात आली. DRI मुंबई विभागीय पथकाने मुंबई विमानतळ कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या सहकार्याने ही कारवाई केली.

विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे दुबईहून आलेल्या तीन भारतीय प्रवाशांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या सामानाची सखोल तपासणी केली असता सोन्याची अत्यंत बारीक पावडर विविध खाद्यपदार्थांमध्ये मिसळून लपविल्याचे आढळले.

दूध पावडर, ओट्स, विविध प्रकारचे पीठ, नुटेला आणि नारळाच्या दूध पावडरसारख्या दिसणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये सोन्याची पावडर मिसळण्यात आली होती. तिन्ही प्रवाशांच्या सामानातून सोन्याची पावडर मिसळलेले सुमारे ३३.५० किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.

जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमधून सोन्याची पावडर वेगळी करून त्याची तपासणी व मूल्यांकन करण्यात आले. या प्रक्रियेत एकूण ९.४० किलो परदेशी बनावटीचे सोने आढळून आले. या सोन्याची किंमत सुमारे १४.८१ कोटी रुपये असल्याचे DRI ने सांगितले. संबंधित सोने सीमाशुल्क कायदा, १९६२ मधील तरतुदींनुसार जप्त करण्यात आले.

चौकशीदरम्यान तिन्ही प्रवाशांनी आपण एकाच संघटित सोन्याच्या तस्करी करणाऱ्या सिंडिकेटसाठी काम करत असल्याची कबुली दिल्याचे DRI ने म्हटले आहे. त्यानंतर तिन्ही प्रवाशांना सीमाशुल्क कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली.

खाद्यपदार्थांचा रंग, पोत आणि स्वरूपाशी साधर्म्य साधत सोन्याची पावडर त्यामध्ये मिसळून नियमित तपासणी यंत्रणेला चकवा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे तपासातून समोर आले आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेली ही पद्धत अत्यंत वेगळी आणि नियोजनबद्ध असल्याचे DRI ने नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS