मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; माटुंगा-मुलुंड आणि कुर्ला-वाशी मार्गावर लोकल सेवा प्रभावित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 September 2026

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; माटुंगा-मुलुंड आणि कुर्ला-वाशी मार्गावर लोकल सेवा प्रभावित


मुंबई JPN NEWS - विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवार, २७ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा-मुलुंडदरम्यान तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान हा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासून दुपारपर्यंत आणि काही ठिकाणी सायंकाळपर्यंत लोकल सेवांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा स्थानकावरून धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि गंतव्यस्थानी सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड येथे पुन्हा जलद मार्गावर वळविण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या कालावधीत सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड स्थानकावरून धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील. माटुंगा येथे त्या पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि गंतव्यस्थानी सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

दरम्यान, खोपोलीहून दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल बदललेल्या वेळापत्रकानुसार दुपारी २.०६ वाजता सुटणार आहे.

हार्बर मार्गावर अनेक लोकल रद्द - 
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेतील डाऊन हार्बर लोकल सेवा रद्द राहतील.

तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेतील अप हार्बर लोकल सेवाही रद्द करण्यात येणार आहेत.

प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच पनवेल-वाशी-पनवेलदरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येतील. ट्रान्स-हार्बर आणि उरण पोर्ट मार्गावरील लोकल सेवा मात्र रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील.

हार्बर मार्गावरील ब्लॉकदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत प्रवाशांना ठाणे तसेच वाशी-नेरुळ मार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी रविवारी प्रवासाचे नियोजन करताना मेगाब्लॉकचे वेळापत्रक लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS