पाण्याच्या कारणावरून गोवंडीत दोघांवर चाकूने हल्ला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2026

पाण्याच्या कारणावरून गोवंडीत दोघांवर चाकूने हल्ला


मुंबई JPN NEWS - घराच्या पाईपमधून उडालेल्या पाण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाल्याची घटना गोवंडीतील बैगणवाडी परिसरात घडली. या घटनेत दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आला असून, त्यातील एकाच्या पोटात चाकू भोसकल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी शादाब अब्दुल कुद्दुस सिद्धीकी यांच्या घराजवळ हा प्रकार घडला. घराच्या पाईपमधून अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून एका आरोपीचा फिर्यादीच्या भावासोबत वाद झाला.

या वादात आरोपीच्या डोक्याला भिंतीचा धक्का लागून दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने बघून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. काही वेळाने तो आपल्या भावाला सोबत घेऊन पुन्हा घटनास्थळी आला आणि फिर्यादीच्या भावासोबत वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली.

हा वाद सोडवण्यासाठी साकिब पुढे आला असता, दुसऱ्या आरोपीने सोबत आणलेल्या चाकूने त्याच्या पोटात वार केल्याचा आरोप आहे. तसेच त्याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बचाव करताना साकिबने हात मध्ये घातल्याने त्याच्या डाव्या मनगटावरही चाकूचा वार होऊन तो गंभीर जखमी झाला.

दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या उजव्या हाताच्या तळव्यावरही चाकूने वार करून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून २६ सप्टेंबर २०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, BNS 2023 मधील कलम 109(1), 115(2), 353(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS