
मुंबई JPN NEWS - राम मंदिर (पूर्व) येथील मृणालताई पुलाजवळ पारशी पंचायत गेटसमोर असलेल्या सार्वजनिक शौचालयात संशयास्पद रासायनिक वासामुळे गुदमरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे साडेआठच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक शौचालयात तीव्र रासायनिक वास येत असल्याची माहिती संबंधित यंत्रणांना दिली. वासामुळे दोन जणांना श्वसनाचा त्रास झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. त्यांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनाही पहाटे ३ वाजून ४९ मिनिटांनी ‘ब्रॉट डेड’ घोषित करण्यात आले. मृतांमध्ये प्रभाकर धनिवार (२४) आणि भाविन देसाई (१८) यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (MFB), पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि बीएमसीच्या संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सार्वजनिक शौचालयातील नेमका कोणता पदार्थ किंवा रसायन यामुळे हा वास निर्माण झाला आणि दोघांचा मृत्यू त्याच्याशी संबंधित आहे का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, रासायनिक गळतीचे नेमके कारण आणि मृत्यूचे वैद्यकीय कारण तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.


No comments:
Post a Comment